दत्तात्रेय
पुराणकाळांतील दत्तोपासनेला लौकिक-ऐहिक आकांक्षा आहेत. पुराणकथांच्या अद्भुत आवरणांतून दिसणारे दत्तस्वरूप रहस्यमय आहे. त्यामुळेच दत्तोपासनेच्या इतिहासाचा वेध घेताना पुराणकाळातील अद्भुतरम्य गूढ वातावरणातून बाहेर यावे लागले.
इसवी सनाच्या पहिल्या सहस्रकाच्या अखेरीस दत्तात्रेय ही देवता पुराण-वाङ्मयांत बरीच प्रसिद्धी पावली होती. अर्थात प्रत्यक्ष लोकधर्माच्या क्षेत्रांत ती उपासनेचा विषय किती प्रमाणांत बनली होती, हे सांगायला आज तरी साधने उपलब्ध नाहीत. पुराणातील दत्तलीलांवरून व्याप्तीचा अंदाज बांधणे अशक्य आहे. पुराणांत वर्णिलेल्या सर्व अनेकविध देवता सार्वत्रिक उपासनेचा विषय बनल्या होत्या, असे म्हणता येणार नाही. यादवपूर्व काळांत महाराष्ट्रांत प्राधान्याने शिवाची (आणि शक्तीचीही) उपासना व्यापक प्रमाणावर रूढ होती. यादवपूर्व काळांतील शेकडो शिलालेखांतून तत्कालीन उपासनेविषयांचे उल्लेख आढळतात. त्या उल्लेखांतून शिवशक्ती-विष्णू या प्रधान उपास्यांशिवाय अनेक गौण देवतांचेही तुरळक उल्लेख आहेत, परंतु कुठेही दत्तात्रेयाचे मंदिर उभारले गेल्याचा वा अन्य दत्तोपासनाविषयक उल्लेख आढळत नाहीत. पुराव्यांचा अभाव हे कारण दत्तोपासनेचे प्राचीन अस्तित्त्व नाकारण्यास पुरेसे नाही, हे जरी खरे असले, तरी नाथ संप्रदायाच्या उदयापूर्वी (इसवी सनाचे ११वे शतक) दत्तोपासना लोकमानसांत विशेष स्थान पावली नसावी असे वाटते.
पुराणात वर्णन केलेल्या दत्तशिष्यापैकी यदु, आयु, अलर्क, सहस्रार्जुन व परशुराम हे क्षत्रिय वृत्तीचे आहेत. दत्तात्रेयाच्या कृपाप्रसादाने वर्णाश्रमधर्माची प्रतिष्ठा राखण्याचे कार्य या दत्तोपासकांनी केले, असे पुराणकारांचे सांगणे आहे. भागवतात नोंदविलेला आणखी एक प्रसिद्ध दत्त-शिष्य म्हणजे प्रल्हाद. हा मात्र राज्यवैभवाचा मोह सोडून मुमुक्षु बनला होता. उपनिषदांत उल्लेखिलेला सांकृती हा दत्तशिष्य एक महामुनी होता. हे पुराणकालीन दत्तोपासक दत्ताचे शिष्य समजले जातात, ते उपासक नव्हेत. प्रल्हाद हा दत्तशिष्य श्रीविष्णूचा उपासक होता, हे सर्वश्रुत आहे. म्हणजे दत्तात्रेय गुरुतत्त्वाचे प्रतीक आहे, उपास्य दैवत नव्हे, अशी काहीशी कल्पना पुराण काळातही रूढ असावी, असे वाटते. या कल्पनेवरूनही दत्तात्रेयाच्या रहस्य मुळावर काही प्रकाश पडू शकेल. दत्तात्रेय हा विष्णूचा अवतार आहे, तर विष्णूच्या राम-कृष्ण आदी अन्य अवतारांप्रमाणे तो उपासनेचा स्वतंत्र विषय न बनता केवळ शक्तिदान करणारा वा मंत्रदीक्षा देणारा गुरूच कसा उरावा? गुरुतत्त्वाचा अंतिम आदर्श हे जे दत्तात्रेयांचें स्वरूप पुराणकाळापासून आजतागायत रूढ आहे, त्या स्वरूपांतच दत्तात्रेयाच्या ‘अवतारा’चे रहस्य दडलेलं असावे. दत्तात्रेय हा तंत्रसाधनेच्या क्षेत्रांतला एक महासिद्ध असला पाहिजे. त्याच्या सिद्धींच्या आणि पारमार्थिक अधिकाराच्या प्रसिद्धीतून अखिल भारतीय lp03साधनेच्या क्षेत्रात त्याला ‘श्रीगुरू’चे स्थान लाभले असावे आणि त्याचे संपूर्ण पुराणीकरण झाल्यानंतरही त्याचे हे लोकप्रसिद्ध ‘सद्गुरुस्वरूप’ कायम राहिले असावे.
पुराणकाळांतील बहुतेक दत्तोपासक ‘अर्थार्थी’ आहेत. त्यांच्या काही लौकिक-ऐहिक आकांक्षा आहेत आणि त्या आकांक्षांच्या परिपूर्तीसाठी वा अडचणींच्या परिहारासाठी त्यांना दत्तकृपेची आवश्यकता वाटत आहे. निष्काम बनून दत्तात्रेयाची अनन्य उपासना करणारे थोर दत्तोपासक अनेक होऊन गेले असले, तरी पुराणकाळातील दत्तोपासनेतील हा ‘सकामते’चा अंश अगदी विसाव्या शतकापर्यंत बहुजनांत टिकून आहे, हे कुणाही निरीक्षकाच्या सहज लक्षात येईल.
पुराणकथांच्या अद्भुत आवरणांतून दिसणारे दत्तस्वरूप रहस्यमय आहे. आज उपलब्ध असलेल्या साधनसामग्रीवरून त्या रहस्याचा संपूर्ण उलगडा करता येणे अशक्य आहे. तेव्हा आपण पुराणांच्या अद्भुतरम्य गूढ वातावरणातून बाहेर येऊ आणि दत्तोपासनेच्या प्रत्यक्ष इतिहासाचा आढावा घेऊ. पुराणांचे क्षेत्र सोडून इतिहासाच्या भूमीवर पाऊल टाकल्याबरोबर आपणास दत्तोपासनेचा आढळ होतो, तो नाथ संप्रदायाच्या वातावरणात. नाथ संप्रदायानंतर महानुभाव संप्रदायांतही दत्तात्रेयाचे स्थान विशेष आहे. पुढे चौदाव्या शतकात नरसिंह सरस्वतींच्या प्रेरणेतून खास दत्तभक्तिप्रधान दत्त संप्रदाय रूढ झाला. परंतु या दत्त संप्रदायाशिवाय वारकरी संप्रदाय, आनंद संप्रदाय, समर्थ संप्रदाय इत्यादी अन्य संप्रदायांतही दत्तात्रेय हे एक परम श्रद्धास्थान मानले गेले आहे. दत्तसंप्रदायेतर संप्रदायांतील दत्तात्रेयाच्या स्थानाचा आपण क्रमाने विचार करू या.
चांगदेवांच्या नावापुढे ‘राऊळ’ हे उपपद आहे. ‘राऊळ’ म्हणजे गुरू वा श्रेष्ठ पुरुष. नाथ संप्रदायात ‘राऊळ’ (रावळ) या नावाचा एक उपपंथ आहे. या उपपंथाचा प्रवर्तक नागनाथ नामक एक सिद्ध समजला जातो. या उपपंथात मुसलमानांचा भरणाही बराच आहे
No comments:
Post a Comment